औरंगाबादमधील १४ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबादमधील १४ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : व्हॉट्सॲपवर आलेली आत्महत्येची व्हिडिओ क्लिप वारंवार पाहू नको म्हणून आई रागावल्याने सातवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली. आनंदनगरात ही खळबळजनक घटना घडली. संजीवनी ऊर्फ दीपाली एकनाथ घेणे असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.

पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, संजीवनीचे आई-वडील चणे-फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे तिचे आई-वडील आणि लहान भाऊ सोमवारी सायंकाळी ६ वाजता व्यवसायासाठी एकत्रित घराबाहेर पडले होते. रात्री नऊच्या सुमारास ते परत घरी आले. त्यावेळी बाहेरील दरवाजा बंद होता. आवाज दिला असता तिने प्रतिसाद दिला नाही. ती शेजाऱ्यांकडे अथवा मैत्रिणीकडे गेली असेल असे समजून ते घरात गेले. त्यांनी शेजाऱ्यांकडे विचारणा केली.

मात्र, त्यांच्याकडे ती नव्हती. लहान भाऊ घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत गेला तेव्हा तेथे संजीवनीने साडीने छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे त्याला दिसले. ते पाहून तो रडतच खाली आला. तिच्या आई-वडिलांनीही ते पाहिले आणि हंबरडा फोडला. शेजारच्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संजीवनीला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात हलविले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

टिकटॉकवर सक्रिय

संजीवनी ऊर्फ दीपाली टिकटॉकवर सक्रिय होती. तिने मैत्रिणीसोबत टिकटॉकवर अनेक व्हिडिओ बनविले होते. ती गारखेड्यातील कलावती चव्हाण शाळेत सातवीत शिकत होती. यावर्षी शाळाच सुरू न झाल्यामुळे ती घरीच होती.

आत्महत्येचे गूढ कायम

नेहमी हसत-खेळत राहणाऱ्या संजीवनीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण समजू शकले नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.आईच्या व्हॉट्सॲपवर आलेली आत्महत्येची व्हिडिओ क्लिप ती वारंवार पाहत होती. त्यामुळे आई तिच्यावर रागावली व मोबाइल हिसकावून घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून ती नाराज आणि शांत शांत राहत होती.