Google Pay चा वापर करणं धोकादायक, खरंच RBI ने घातली बंदी?; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण

कोरोना लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्यवहार हे मोठ्या प्रमाणात केले जात आहेत.

Google Pay चा वापर करणं धोकादायक, खरंच RBI ने घातली बंदी?; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्यवहार हे मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. डिजिटल पेमेंटसाठी भारतात मोठ्या प्रमाणात गुगल पे हे अ‍ॅप वापरलं जातं. मात्र सोशल मीडियावर गुगल पेचा वापर करणं महागात पडू शकतं. सुरक्षितता धोक्यात येऊ शकते अशा आशयाचा मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. तसेच RBIने गुगल पे या पेमेंट अ‍ॅपवर बंदी घातली आहे असं देखील म्हटलं जात आहे. यानंतर आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) सोशल मीडियावर व्हायरल झालेला गुगल पे बाबतचा दावा फेटाळून लावला आहे.

गुगल पे च्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करणं, पैसे ट्रान्सफर करणं सुरक्षित नाही. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या पेमेंट अ‍ॅपवर बंदी घातली आहे असा मेसेज काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सध्या गुगल पे चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने या मेसेजची चर्चा सर्वत्र रंगली आहे. मात्र आता गुगल पे नेच याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. गुगल पेने एक निवेदन जारी केले आहे ज्यामध्ये असे  Google pay भारतात अधिकृत आहे आणि देशातील अन्य मान्यताप्राप्त UPI अ‍ॅप प्रमाणेच कायदेशीर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

 

 

"आम्ही सोशल मीडियावर शेअर झालेल्या काही गोष्टी पाहिल्या. ज्यामध्ये गुगल पेद्वारे पैसे ट्रान्सफर करणं हे कायद्याने सुरक्षित नाही असं म्हटलं आहे. तसेच हे अ‍ॅप अनअधिकृत असल्याचंही म्हटलं आहे. मात्र हे खरं नाही. गुगल पे हे थर्ड पार्टी अ‍ॅप आहे. पण पेमेंट्स पूर्णपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्चित केले जातात. NPCI च्या वेबसाईटवर हे तुम्ही व्हेरिफाय करू शकता" अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. 

 

गुगलच्या प्रवक्त्यानी गुगल पे प्लॅटफॉर्मवरुन पैसे ट्रान्सफर करताना काही अडचण आल्यास कायद्याद्वारे ती सोडवली जाऊ शकत नाही कारण हे अ‍ॅप अनधिकृत आहे. हा फिरणारा मेसेज चुकीचा असल्याची माहिती दिली आहे. RBIने कोर्टाच्या सुनावणीत असं कुठेही म्हटलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांना विविध पद्धतीने ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ओएलक्स, पेटीएम आणि आता फोन पे आणि गुगल पे अ‍ॅपवर बोनस मिळाल्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गोपनीय माहिती घेऊन त्यांच्या अ‍ॅपवरुन लाखो रुपये उकळण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं आहे.