Ms dhoni|धोनीने घेतले हे १० धाडशी निर्णय|पहा कोणते आहेत हे १० निर्णय
क्रिकेटविश्वात असा कोणताच चषक नाहीये, ज्यावर महेंद्रसिंग धोनीनं आपलं नाव कोरलं नाहीये!
50 षटकांचा विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी धोनीनं जिंकलाय, 20 षटकांचा टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स टॉफी धोनी जिंकलाय, कसोटी सामन्यांमध्येही धोनीनं भारतीय संघाला अव्वल स्थानी पोहोचवलं.
धोनीनं काल (15 ऑगस्ट 2020) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. हे निमित्त साधत त्याच्या आजवरच्या 'बेस्ट डिसिजन'वर एक नजर टाकूया.
1) जोगिंदरला बनवलं हिरो
2007 सालच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जर महेंद्रसिंग धोनीनं जोगिंदर शर्माला शेवटची ओव्हर टाकायला दिली नसती, तर जोगिंदर शर्मा या टीमचा सदस्य होता, हेही कधी जगाला कळलं नसतं.टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरूद्ध पाकिस्तान असा होता आणि पाकिस्तानला शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावा हव्या होत्या. भारताला केवळ एक विकेट हवी होती, पण पाकिस्तानकडून फलंदाजीसाठी तेव्हा फॉर्ममध्ये असलेला मिस्बाह उल हक होता.
अत्यंत महत्त्वाच्या वेळी धोनीनं अनुभवी हरभजन सिंगऐवजी जोगिंदर शर्माच्या हाती चेंडू दिला. जोगिंदरनं तिसऱ्या चेंडूत मिस्बाहची विकेट घेतली आणि धोनीचा धाडसी निर्णय अविस्मरणीय ठरवला.
2) बॉल आऊटचा किस्सा
2007 च्या टी-20 विश्वचषकाच्या लीग राऊंडमध्ये पाकिस्तान विरूद्ध भारत हा सामना टाय झाला. या सामन्याचा निकाल बॉल आऊटनं होणार होता. बॉल आऊटमध्ये एकाच चेंडूत फलंदाजाची विकेट घ्यायची असते.
पाकिस्ताननं नियमित गोलंदाज निवडला, मात्र, धोनीनं इथंही धाडस दाखवलं. हरभजनऐवजी वीरेंद्र सहवाग आणि रॉबिन उथप्पा यांसारख्या पार्ट टाईम गोलंदाजांकडे चेंडू सोपवला. मात्र, या सामन्यात भारत विजयी झाला आणि इथेही धोनीचा निर्णय योग्यच ठरला.
3) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 5 व्या स्थानी फलंदाजीचा निर्णय
2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील कुलशेखराच्या चेंडूला षटकार लगावलेला तो क्षण कोण विसरू शकेल?
भारताला 28 वर्षांनंतर विश्वचषक मिळवून देणाऱ्या त्या अंतिम सामन्यात धोनीनं नाबाद 93 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात धोनी जर खेळला नसता, तर कदाचित तो टीकेचा धनी झाला असता. कारण अंतिम सामन्याआधीपर्यंत धोनी अर्धशतकाची नोंदही करू शकला नव्हता.अंतिम सामन्यात मात्र धोनी तेव्हा फॉर्ममध्ये असलेल्या युवराजच्या पाचव्या स्थानी स्वत: उतरला. त्याचं कारण असं होतं की, गंभीरच्या रूपात आधीच मैदानात डावखुरा फलंदाज होता. त्यामुळे समतोल साधण्यासाठी युवराजऐवजी धोनी स्वत: फलंदाजीला उतरला होता.
दुसरं कारण हेही होतं की, श्रीलंकेच्या स्पिनर्ससमोर आपण चांगल्या धावा काढू शकू, असा धोनीला विश्वास होता आणि हा विश्वास खराही ठरला.
4) युवराजकडे चेंडू सोपवण्याचा निर्णय
युवराज सिंग खरंतर मूळचा धडाकेबाज फलंदाज. मात्र, 2011 च्या विश्वचषकात धोनीनं युवराजला नियमित गोलंदाजासारखं समोर आणलं. समोरच्या संघाला कोड्यात टाकण्यासाठी धोनीचा हा निर्णय फायद्याचा ठरला.
युवराजने 9 सामन्यात 75 ओव्हर्स टाकल्या आणि त्यात 15 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, युवराजनं उपांत्य पूर्व, उपांत्य, आणि अंतिम सामन्यात प्रत्येक दोन-दोन विकेट्स घेतल्या.
5) 'छुपा रुस्तम' अश्विन-रैना
2011 च्या विश्वचषकात धोनीनं सुरैश रैना आणि आर अश्विन यांना सुरुवातीच्या काही सामन्यात एकप्रकारे 'लपवलं' होतं आणि नॉक आऊटच्या वेळी 'सरप्राईज पॅकेज'प्रमाणे त्यांचा वापर केला.
अश्विननं 2011 च्या विश्वचषकात दोन सामने खेळले. त्यातील एक सामना उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाविरोधातील होता. या सामन्यात धोनीनं अश्विनकडूनच गोलंदाजीची सुरुवात केली.
दोन विकेट्स घेतल्यानंतर अश्विननं ऑस्ट्रेलियाची फलंदाजीची बाजू कमकुवत केली. त्यानंतर सुरेश रैनानेही ऑस्ट्रेलियाविरोधात नाबाद 34 धावा घेत विजय मिळवून दिला होता.
रैनानं पाकिस्तानविरोधात उपांत्य फेरीत नाबाद 36 धावा केल्या होत्या.
6) नेहराला संधी
2011 च्या विश्वचषकाच्या सुरुवातीच्या काही सामन्यात आशिष नेहरानं अपेक्षित कामगिरी केली नव्हती.मात्र, तरीही उपांत्य फेरीत पाकिस्तानविरोधातील सामन्यात धोनीनं नेहराला संधी दिली आणि तेही ऑस्ट्रेलियाविरोधात चांगली कामगिरी बजावलेल्या अश्विनच्या जागी. धोनीचा हा निर्णय नेहरानं योग्य ठरवला.
10 ओव्हरमध्ये 33 धावा देत नेहरानं दोन विकेट्स घेतल्या. नेहराच्या या कामगिरीमुळे भारताला अंतिम सामन्यात धडक मारण्यात मोठा हातभार लागला.
7) ट्राय सीरीजसाठी तरुण खेळाडूंचा आग्रह
ऑस्ट्रेलियात 2008 मध्ये झालेल्या ट्राय-सीरीजसाठी तरुण खेळाडू निवडण्याची मागणी धोनीनं निवड समितीकडे केली. ऑस्ट्रेलियातील मोठ्या मैदानांमध्ये जास्त वय असलेले खेळाडू अयशस्वी ठरू शकतात, असा धोनीचा दावा होता.यावरून धोनीवर खूप टीका झाली. मात्र, धोनीच्या याच निर्णयामुळे भारतीय टीम ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा ट्राय-सीरीज जिंकली.
या विजयी टीममध्ये गौतम गंभीर, रोहित शर्मा, प्रवीण कुमार असे तरुण खेळाडू होते.
8) इशांतला गोलंदाजी करण्यास देण्याचा निर्णय
2013 साली इंग्लंडमध्ये खेळवल्या गेलेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाऊस पडल्यानं सामना 20-20 ओव्हरचा खेळवण्यात आला. भारतानं इग्लंडसमोर 130 धावांचं लक्ष्य ठेवलं.
मॉर्गन आणि बोपाराच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडची टीम विजयाकडे वाटचाल करत होती. इंग्लंडला अखेरच्या तीन ओव्हरमध्ये 28 धावा करायच्या होत्या. त्याचवेळी धोनीनं गोलंदाजीची धुरा इशांत शर्माच्या हाती दिली.
खरंतर इशांतच्या हाती चेंडू सोपवणं हा निर्णय धाडसाचा होता. मात्र, इशांतनं एकाच ओव्हरमध्ये मॉर्गन आणि बोपाराला बाद करून माघारी पाठवलं आणि त्यामुळे इग्लंडचं विजयाचं स्वप्न फसलं.
9) ...आणि रोहितला 'सलामीवीर' ठरला
रोहित शर्मा आधी मिडल ऑर्डरमध्ये खेळायचा. त्याची कामगिरी तितकीशी चमकदार नव्हती.
धोनीनं रोहितला एकदिवसीय सामन्यात थेट सलामीलाच पाठवला आणि त्या संधीचा रोहितनं फायदा घेतला. त्यानंतर रोहित शर्मा सर्वोत्तम म्हणूनच गणला जाऊ लागला
10) IPLमध्येही धाडसी निर्णयांचा बोलबाला
भारतीय टीमसोबतच धोनीनं IPL मध्ये चेन्नई सुपरकिंग्जलाही यशस्वी केलं.
काही दिवसांपूर्वीच धोनीनं सांगितलं होतं की, चेन्नई सुपरकिंग्जचे प्रमोटर एन श्रीनिवासन यांच्या विनंतीनंतरही एका खेळाडूशी करार करण्यास नकार दिला होता.
धोनीनं चेन्नई सुपरकिंग्जसाठी घेतलेले निर्णयही महत्त्वाचे आणि यशस्वी ठरले आहेत.