बलात्कार : '86 वर्षांच्या आजी विनवणी करत होत्या पण त्याने त्यांच्यावर बलात्कार केला'

भारतात दरवर्षी बलात्काराच्या हजारो घटना घडतात. अशा स्वरुपाचा अत्याचार भीषणच असतो मात्र यापैकी काही घटना मन अस्वस्थ करून सोडतात. दिल्ली पोलिसांनी तिशीतल्या एका माणसाला 86 वर्षीय आजीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे.

बलात्कार : '86 वर्षांच्या आजी विनवणी करत होत्या पण त्याने त्यांच्यावर बलात्कार केला'

सदरहू महिला सोमवारी संध्याकाळी आपल्या घराबाहेर दूधवाल्याची वाट पाहत उभी होती. त्यावेळी अत्याचार करणाऱ्याने त्यांना गाठलं अशी माहिती दिल्ली कमिशन फॉर वुमनच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सांगितलं.

दूध घेऊन येणारा नेहमीचा माणूस आज येऊ शकणार नाही असं त्या अत्याचार करणाऱ्याने आजींना सांगितलं. तुम्हाला दूध घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी मी सोडतो असं सांगितलं.

आजींनी त्या तरुणावर विश्वास ठेवला. त्या तरुणाने आजींना जवळच्या शेतात नेलं आणि त्यांच्यावर बलात्कार केला.

"त्या रडत होत्या आणि सोडून देण्यासाठी विनवणी करत होत्या. मी तुझ्या आजीच्या वयाची आहे असं त्या सांगत होत्या. मात्र त्याने विनंत्या धुडकावून लावल्या. आजींनी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो तरुण त्यांच्यावर जबरदस्ती करत राहिला," असं मालिवाल यांनी सांगितलं.

स्थानिकांनी आजींचा आवाज ऐकला आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेत आजींची सुटका केली. त्या तरुणाला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.

मालिवाल यांनी मंगळवारी आजींची भेट घेतली. त्यांच्यावर जो प्रसंग ओढवला ते ऐकणं हृदयद्रावक होतं असं मालिवाल यांनी सांगितलं.

"त्यांच्या दोन्ही हातांवर वृद्धत्वामुळे सुरकुत्या पडल्या आहेत. त्या जे सांगतात ते ऐकताना धक्का बसतो. त्यांच्या चेहऱ्यावर, शरीरावर जखमा आहेत. त्यांच्या योनीमार्गातून रक्तस्राव झाला आहे. त्या प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत," असं मालिवाल सांगतात.

त्या तरुणाला देहदंडाची शिक्षा अशी मागणी मालिवाल यांनी केली आहे. हे कृत्य अघोरी आणि अमानवी असल्याचं त्यांनी सांगितलं.

दिल्ली उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि दिल्लीचे नायब राज्यपाल यांना हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची मागणी करणार असल्याचं मालिवाल यांनी सांगितलं. सहा महिन्यात त्या तरुणाला फासावर लटकवण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

डिसेंबर 2012 मध्ये राजधानी दिल्लीत 23 वर्षीय मुलीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्या घटनेविरोधात देशभरात आंदोलनं, निषेध नोंदवण्यात आले होते. मात्र तरीही बलात्कार तसंच लैंगिक शोषण, छळाच्या घटना सातत्याने घडतातच.

गंभीर स्वरुपाच्या जखमांमुळे त्या मुलीचा मृत्यू झाला. चार आरोपींना मार्च महिन्यात फाशी देण्यात आली.

लैंगिक गुन्ह्यांचं सखोल परीक्षण होत असतानाही त्यांच्या संख्येत घट होण्याचं लक्षण नाही.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोनुसार, 2018 मध्ये पोलिसांनी बलात्काराच्या 33,977 केसेस नोंदवल्या. दुसऱ्या शब्दात दर पंधराव्या मिनिटाला देशात एका महिलेवर बलात्कार होतो. मात्र हा आकडा पूर्णांशाने खरा नाही कारण अनेक प्रसंगांमध्ये पोलिसांकडे तक्रार नोंदवली जात नाही.

अनेक बलात्काराच्या घटना लोकांपर्यंत पोहोचतही नाहीत. अतिशय क्रूर, अमानवी, निर्घूण पद्धतीने अत्याचाराच्या बातम्यांचं वृत्ताकंन केलं जातं.

 

फोटो संकलित आहे