रनर्स असोसिएशन पंढरपूर आयोजित DVP पंढरपूर मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

Dvp pandharpur marathon

रनर्स असोसिएशन पंढरपूर आयोजित DVP पंढरपूर मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

पंढरपूर दि.०४- स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर सोबत पंढरपूर तंदुरुस्तही राहावं याच उद्देशाने रनर्स असोसिएशन पंढरपूर यांच्या वतीने दिनांक २ फेब्रुवारी रोजी पंढरपूर नगरीत DVP पंढरपूर मॅरेथॉन सोहळा संपन्न झाला. या भव्यदिव्य अशा सोहळ्याचे यशस्वी नियोजन करण्यासाठी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी गेल्या दीड महिन्यापासून अविरत परिश्रम घेत होते, या सर्वांच्या सुक्ष्म नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. २  फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजता दहा किलोमीटर स्पर्धेला सुरवात झाली. DVP ग्रुपचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेची सुरवात करण्यात आली. दहा किलोमीटर आणि साडेतीन किलोमीटर अशा दोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

पहाटेच हजारो धावपटू या स्पर्धेसाठी दाखल झाले होते. सुरवातीला योगासने करण्यात आली. लहान थोर , अबाल वृध्द , महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. 

दहा किलोमीटर पुरुष खुला गटात रितेश मुंगले याने ३३ मिनिटे १४ सेकंदात प्रथम क्रमांक मिळवला. तर पंढरपूर पुरुष गटात श्रेयस शिंदे याने प्रथम क्रमांक मिळवला. तर महिला खुला गट व पंढरपूर महिला गट या दोन्हीमध्ये श्रध्दा हाके हिने ३९ मिनिटे ३३ सेकंदात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत सुमारे २५००हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवून उदंड प्रतिसाद दिला. ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी डी.व्ही.पी उद्योग समूह, संकल्प नागरी पतसंस्था, गणपती हॉस्पिटल, फॅबटेक  सेंटर, आय.एम.ए, पोलीस प्रशासन, नगरपालिका, सार्वजनीक बांधकाम विभाग, रेल्वे खाते इत्यादिंचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंढरपूर शहर, तालुका तसेच सोलापूर ,सांगली, उस्मानाबाद पुणे अश्या मोठमोठ्या शहरातील स्पर्धकांनी देखील सहभाग नोंदवला होता. उपस्थित सर्वच स्पर्धकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्वरित असोसिएशन व नगरपालीका स्वच्छता प्रशासन यांच्या साहाय्याने रेल्वे ग्राउंड व धावमार्गाची साफसफाई करण्यात आली.

 

डॉ सागर कवडे सो उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पंढरपूर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन 10 किलोमीटर अंतर 48 मिनिट 57 सेकंदात पूर्ण करून 30 ते 45 वयोगटात 2 क्रमांक तर  वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे  यांनी 45 ते 60 वयोगटात मॅरेथॉन मध्ये 10 किलोमीटर अंतर 54 मिनिट 14 सेकंदात पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला तर पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी 10 किलोमीटर अंतर 60 मिनिटात पूर्ण केले