सोलापुरात पुन्हा लॉकडाऊन अशा अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार- जिल्हाधीकारी

 

सोलापूर, दि.11: सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन केला जाणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असणारे मेसेजेस चुकीचे आहेत. लॉकडाऊन केला जाणार नसून नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केले आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काही भागात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाणार, अशा आशयाचे मेसेज सोशल मिडियावर व्हायरल झाले. याबाबत श्री. शंभरकर यांनी सांगितले की, हे मेसेजेस पूर्णपणे चुकीचे असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गोंधळून जाऊ नये लॉकडाऊन जाहीर करण्याचे चुकीचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉरवर्ड करू नयेत. अशा प्रकारचे चुकीचे आणि जनतेची दिशाभूल करणारे मेसेज सोशल मीडियावरून फॉरवर्ड करणाऱ्यांवर पोलीस कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.