ग्रामीण जीवन आणि माध्यम

ग्रामीण जीवन आणि माध्यम

हिवाळ्यात दाणे टिपायला निघालेली, तारांवर बसलेली पक्षांची रांग आता दिसत नाही कारण, पिकांवर जहाल कीटकनाशकांचा मारा करून त्यांना आम्ही कधीच मारून टाकले आहे.
भल्या पहाटे ओढ्यात डुंबायला निघालेल्या गायी-म्हशीं आता दिसत नाहीत कारण, मोटारपंप ठेऊन आम्ही ओढा कधीचा कोरडा करून टाकला आहे.
पण अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही “मेरे रस्के कमल”...च्या खालोखाल; “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी..” हा हरिपाठ आजही गावोगावी गायला जातोय.
साधनांची रेलचेल गावांपर्यंत पोहोचल्याने गावे विकसित झाल्याचा आभास होतोय. पण प्रत्यक्ष चित्र काहीसे वेगळे आहे.
“जो मेरे गांव के खेतों मे भूख उगने लगी
मेरे किसानो ने शहर मे नौकरी कर ली!” (आरिफ शेख)
वरील कावितेच्या ओळीतील सत्यता महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात पावलोगनिक पटते. शेती हाच ग्रामीण जीवनाचा आत्मा असून हतबल झालेला शेतकरी पाहता आत्मा हरवलेली गावेच तेवढी उरली आहेत. ग्रामीण भागातील हे चित्र येथे मांडतांना भूमिका नकारात्मक वाटत असली तरी तेच सत्य आहे. गावे अशी हताश का दिसत आहेत? गावे भकास का दिसत आहेत? पाणीटंचाई, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव आणि शासनावर अवलंबून राहण्याची बळावलेली वृत्ती. ही आहेत ग्रामीण जीवनातील नैराश्याची कारणे.
डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी शिवारात निघालेल्या माय माऊल्या म्हणजे तीव्र पाणी टंचाईचे निदर्शक मानले जात असले तरी वास्तविक हे दृश्य त्या शिवारात जलसाठा असल्याचे दर्शविते. आता डोईवरच्या हंड्यांची जागा tankar ने घेतली आहे. कारण अलीकडे हंडाभर पाणी देखील शिवारात उरले नाही व गावाला आता दूर कोठून तरी tankarने पाणी आणून पुरवावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचीच प्रचंड वानवा असताना शेती सिंचनाला पाणी मिळणार कोठून? पाणीटंचाई पासून कायमची मुक्तता यावरच आता गावाचे अस्तित्व अवलंबून आहे.
गावातून पाणी व तरुणाई हद्दपार:
गाव रोजगार पुरवू शकत नाही म्हणून तरुणांनी शहराचा रस्ता धरला का? तर बऱ्याच अंशी ते खरे आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवू शकत नाही म्हटल्यावर रोजगारासाठी शहर गाठणे भाग होतं. कुटुंबे विभक्त होत गेल्याने शेती तुकड्या तुकड्यात विभागली गेली शेतीच्या छोट्या तुकड्यावर गुजराण करणे अवघड होऊन बसले. जगभरात कुठेही जा मानवी वस्ती पाण्याच्या स्रोताभोवती वाढली. आज हेच स्रोत म्हणजेच नदीनाले कोरडे पडू लागले आहेत. पूर्वी दुष्काळप्रवण म्हणून गणलेल्या गावांपर्यंत पाण्याची कमतरता सीमित होती. आता ति राज्यभर विस्तारत चालली असुन गावे बकाल होण्यात त्याचे रुपांतर होत आहे. शेतीला पाणी, पाण्यामुळे पिक, पिकातून रोजगार हे चक्र आता खंडीत झाले आहे. भूमी फक्त अन्न्धान्न्य, फळे, भाज्या जन्माला घालीत नाही तर ती रोजगार पुरविते. गावातून आधी पाणी आटू लागले आणि पाहता पाहता रोजगारही. म्हणूनच आता गावातल्या तरुणाने रोजगारासाठी शहराची वाट धरली आहे.
गांवमे घुसकर तुम तो सब ही लुट गये
खेती लुटी, नदीयां लुटी, जंगल लुटे और
खडे हो गये महल खेत मे, मुंहके छीने कौर!
धरणाच्या पाण्यावर शहरांचा अधिकार वाढला:
धरणे १०० टक्के भरली तरी त्यातले ५० टक्क्यापेक्षा जास्त पाणी आता शहरे आणि गावांना पिण्यासाठी राखून ठेवले जाते. अलीकडील ५ वर्षात धरणे पूर्ण भरलीच नाही. त्यामुळे आहे ते पाणी पिण्या करीता राखून ठेवले गेल्याने शेतीला सिंचनासाठी मिळणे बंद झाले. उदाहरण गिरणा धरणाचेच घेता येईल. हे धरण कितीही भरले तरी धरण क्षमतेच्या ५४% पाणी पिण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे. २०१८ च्या पावसाळ्यात हे धरण ४८% भरल्याने सगळेच पाणी नदी काठावरील मोठी शहरे व गावांसाठी पिण्यासाठी सोडण्यात आले. काठावरील मुठभर गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो गावे आज पाण्यावाचून तळमळत आहेत. एकूण काय तर मोठ्या शहरांची तहान भागविण्यासाठी लहानमोठी गावे पाण्यासाठी वंचित राहात आहेत.
मुंबई,ठाणे,कल्याण ह्या महाकाय शहरांना लागणारे पाणी शेजारच्या नाशिक, नगर व पुणे जिल्ह्यातील धरणातून पुरविले जाते. ती गरज किती प्रचंड आहे याचे एक बोलके उदाहरण म्हणजे, इगतपुरी तालुक्यातील ७०% क्षेत्र हे धरणक्षेत्रात गेले आहे. हे सगळे पाणी ठाणे, मुंबई महानगरासाठी पुरविले जाते. कृषीयोग्य जमीन तर पाण्याआखाली गेलीच पण ज्या पाण्यातून त्या भागातील शेती बागायती झाले असती ते महानगरांची तहान भागवित आहे. याचा अर्थ शहरांना पाणी देऊ नये असा नसून. आपली व्यवस्था अशी आहे की ती शहरांची घेते पण ग्रामीण भागातही पाण्याची तेवढीच गरज असते हे विसरले जाते. शहरांची सुविधा बघताना ग्रामीण भागातील जनतेसाठी सावत्रपणाची वागणूक दिली जाते.
लाखो कोटीच्या पाणी योजना, पण पाणी नाही:
पाण्याबाबत शहरावर मेहेरबानी आणि गावाकडे दुर्लक्ष असे झालेय का? तर तसेही नाही. हजार-पंधराशे वस्तीच्याही गावासाठी ५० लाखापासून ते एक-दीड कोटी रुपयांपर्यंत पिण्याची पाणी योजना शासनाने पूर्ण केली आहे. योजना त्तर झाल्या पण पाण्याचे जिवंत स्रोत तर पाहिजेत ना? आहेत फक्त कोरड्याठाक विहिरी आणि निष्काळजीपणे केलेली तुटकी फुटकी पाईपलाईन. परिणामी आजही पाण्यावाचून गावे तहानलेलीच. चुकले कुठे तर गावोगावच्या पाणी योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण. याला प्रशासकीय यंत्रणा जशी जबाबदार आहे तसे गावपातळीवरचे नेतृत्व देखील जबाबदार आहे.
राज्यातील ९०% गावात आजही गावकरी गावातील विकास कामाच्या नियोजनात सहभागी होत नाहीत. ग्राम पंचायतीचे सरपंच आणि सदस्य जे करतील त्याला मुकाट्याने होकार देण्यात गावकरी धन्यता मानतात. परिणामी शासकीय योजना पोहोचूनही गावात औदासिन्य जाणवते. पाटोदा,बारीपाडा, हिवरेबाजार अशा स्वावलंबी गावांची उदाहरणे आहेत पण ती संख्या फारच अल्प आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव:
गावातला प्रत्येक माणूस आज शिक्षित आहे. अंगणवाडीपासून ते माध्यमिक विद्यालयापर्यंतची सोय गावात आज आहे. परंतु तेथे मिळते ते शिक्षण गुणवत्तापूर्ण नाही. येथून शिकलेला तरुण शहरात जाऊन कारखान्यात चतुर्थ श्रेणी मजूर बनतात. मुबई-पुण्यात जावून रिक्षा चालवितो किंवा तळमजल्यावरचे ओझे वरच्या मजल्यावर पोहोचवतो. आयटीआय,इंजिनियरिंग,संगनकीय आदी कौशल्य शिक्षणात ते प्रगती करू शकत नाहीत तिथे उच्चशिक्षणाची स्थिती तर फारच वाईट. ग्रामीण भागातून इंजिनियर झालेले तरुण आजही शहरात पाच-दहा हजारावर नोकरी करतांना दिसतात.
शिकून शेती करायला थांबणारे नगण्यच. कारण शेती म्हणजे ‘न परवडणारा व्यवसाय’ ह्यावर शिक्कामोर्तब झाल्याने आवड आणि क्षमता असूनही शेतीत थांबण्याचे धाडस आजचा तरुण करताना दिसत नाही. कारण फायद्याची शेती करूनही शेतकरी तरुणांचे विवाह होत नाहीत ही नवी समस्या निर्माण झाली आहे.
गावावर राजकारणाचा पगडा:
आज गावाची पहाट पूर्वीसारखी शेतावर होत नाही. गावातील चौकात अगर गावाबाहेरच्या टपरीभोवती घोळक्याने जमून लोक तासंतास गप्पा मारतात. ह्या गप्पा ना शेतीवरच्या असतात ना ग्रामविकासाच्या. राजकारण हाच त्यातला केंद्रबिंदू असतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ही चर्चा रंगते. ग्राम पंचायतीच्या निवडणुका म्हणजे वादाचे केंद्र. पदप्रतिष्ठेपायी गावात गटातटाचे रान माजून गावाची शांतता नष्ट होते. यानिमित्ताने भाऊबंदकीतले वाद चिघळतात. गावाची विकासकामे देखील राजकारणाच्या अवतीभोवती केंद्रित होतात. गावात जे होईल ते राजकीय नेतृत्वामुळेच ही भावना गावात रुजली असून लोकसहभाग नगण्य होत चालला आहे. आता विकासनिधी थेट गावाला येतो. त्यामुळे यानिधीवर डोळा ठेऊन लोक राजकारणात उतरू लागलेत. अर्थात सगळीच काही लूट चाललीय असे नाही. गावात पक्क्या गटारी झाल्या, घरोघरी नळ पोहोचले, अंतर्गत रस्ते कॉंक्रीटचे झाले, मोबाईल टॉवर उभे राहिले, इंटरनेट पोहोचले, शेतापर्यंत रस्ते पोहचले. म्हणून गाव सुखी झाले का? गावाच्या समस्या दूर झाल्या का?
गांव आता अधिकाधिक परावलंबी होत चाललय. प्रत्येक कुटुंबाला दारिद्र्य रेषेखालील यादीत यायचय. प्रत्येकाला रेशनचे २-३ रुपये किलोने धान्य हवंय. सगळ्या सोयी सबसिडीतून मिळाव्यात अशी अपेक्षा आहेत. जर काही करेल ते शासन ही भूमिका आता ग्रामीण भागाची झालीय.
......आणि प्रसिद्धी माध्यमे:
जवा दुष्काळ, दुष्काळ घिरट्या घाली!
तवा गावाला, गावाला कुणीना वाली!
कसं सुगीत, सुगीत घालतात गस्ता,
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता!! (इन्द्रजीत भालेराव)
प्रसिद्धी माध्यमातून ग्रामीण जीवन पूर्वीपेक्षा अधिक ठळकपणे मांडले जाऊ लागले आहे. दुष्काळ असो अगर गावाच्या समस्या आता माध्यमे हिरीरीने मांडू लागले आहेत. परंतु अद्यापही ग्रामीण भागाचे वास्तविक चित्र माध्यामातून येत नाही. दुष्काळाची माहिती तर रकानेच्या रकाने भरून दिली जाते पण, दुष्काळावर मात करणाऱ्या गावाचा वास्तव लढा पुढे येत नाही. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण झाल्याचे तर छापले जाते. पण लोकसहभागातून गावाने केलेल्या कामाला फारसे स्थान मिळत नाही. लोकांनी केलेल्या कामाचे बारकावे मांडले जात नाहीत. आमिरखानच्या भोवती ग्लैमर आहे म्हणून जेवढे कौतुक वाटर कप स्पर्धेचे झाले तसे लोकांनी स्वप्रेरणेने केलेल्या कामाचे होत नाही.
ग्रामीण माणूस त्यांचे वास्तव सांगण्याचा प्रयत्न करतो पण ते ऐकून घेण्याची मानसिकता माध्यमांची नसते. किती पत्रकाराना दुधाचे ग्रामीण भागातले दर माहित आहेत? दुधाचे दर माहित असतील पण दूध देणाऱ्या गायी म्हशीला खायला लागणाऱ्या एका चाऱ्याच्या पेंडीला ७० रुपये लागतात हे माहीत आहे? किती जनांना हे माहित आहे की, जे दूध आपल्या घरापर्यंत ४०-५० रुपयात पोहोचते त्यासाठी शेतकरी पाणी टंचाईच्या या दिवसात विकतचे पाणी जनावराना पाजतो?
शहरातले सर्व दवाखाने ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांनी भरलेले असतात. बहुतांश रुग्ण अशुद्ध पाण्याची देणगी असतात. ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत हे अशुद्ध व घातक आजारांना निमंत्रण देणारे आहेत. जगाचा पोशिंदा शेतकरी आपल्या पिकांवर घातक रसायनांचा वापर करू लागला असून त्यामुळे कैंसर सारखे घातक आजार बळावत चालले आहेत. हे सगळे ग्रामीण जीवनातील बदलांचे परिणाम आहेत. रसायनांचा फवारणीसाठी आग्रह धरणाऱ्या यंत्रणेच्या विरुद्ध अद्याप माध्यमे उभी ठाकल्याचे दिसत नाही.
असो रस्ते, इंटरनेटमुळे गावाचे शहरीकरण झाल्याचा आभास आज होत असला तरी गावे उदास, आजारी आणि कर्जबाजारी होत चालली आहेत. ना धड शिक्षित ना धड कष्टाळू शेतकरी अशी मोबाईलमध्ये डोकं घालून गावाच्या वेशीवर भेटणारी तरुण पिढी असे भीतीदायक चित्र म्हणजे आजचे गाव, असे झाले आहे.
-चिन्तामन