पहिल्यांदा सेक्स करण्याच नेमकं योग्य वय काय असावं ?

पहिल्यांदा सेक्स करण्याच नेमकं योग्य वय काय असावं ?
सेक्स पहिल्यांदा करण्याचं योग्य वय

'So when did you lose your virginity?' 'तू व्हर्जिन आहेस का?'

असे काही प्रश्न आपल्याला नेहमीच कुणी ना कुणी विचारले असतील. तुम्ही एकतर या प्रश्नावर हसता, पुढच्या 'व्यक्तीने विचारलंच कसं?' म्हणून स्तब्ध होता, किंवा फुशारकी मारण्यासाठी खोटं उत्तर देता. किंवा प्रामाणिकपणे त्याचं उत्तर देता. अर्थातच, या सर्व शक्यता विचारणारी व्यक्ती कोण, यावर अवलंबून असतं.

पण खरंच सेक्स करण्याचं योग्य वय काय? तुम्ही खूप घाई केली की 'ती' बरोबर वेळ होती? असे अनेक प्रश्न आपण अनेकदा स्वतःलाच विचारत असतो.

लैंगिक आचरणासंबंधी ब्रिटनमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात विचारण्यात आलं होतं की त्यांना कुठल्या गोष्टीची सर्वांत जास्त खंत वाटते? त्यांचं उत्तर होतं - कौमार्य गमावलेल्या तरुणांना खूप कमी वयात शरीर संबंध ठेवणे, ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक वाटते.

आपण पहिल्यांदा सेक्स केला ती 'योग्य वेळ' नव्हती, असं विशीतील या तरुणांपैकी एक तृतियांशांपेक्षा जास्त मुली आणि जवळपास एक चतुर्थांश मुलांना वाटतं.

ब्रिटनमध्ये परस्पर सहमतीने शरीरसंबंध ठेवण्यासाठी कायदेशीर वय किमान 16 वर्ष आहे तर भारतात हे वय 18 आहे.

National Survey of Sexual Attitudes and Lifestyles (NATSAL)ने हे सर्वेक्षण केलं आहे. साधारणपणे दशकातून एकदा हा सर्वे करण्यात येतो. ब्रिटेनमधील तरुणांच्या लैंगिक वागणुकीची सविस्तर माहिती या सर्वेक्षणातून मिळते.

London School of Hygiene and Tropical Medicine मधील संशोधकांनी 2010 ते 2012 या काळात जवळपास तीन हजार तरुणांकडून ही माहिती गोळा केली आहे.

या सर्वेचा अहवाल BMJ Sexual and Reproductive Health मासिकात छापून आला आहे.

निष्कर्ष

सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या तरुणांमधील 40% मुली आणि 26% मुलांना 'ती वेळ योग्य नव्हती' असं वाटतं.

याविषयी अधिक तपशील विचारल्यावर आपली व्हर्जिनिटी गमावण्यासाठी आणखी थोडा काळ वाट बघायला हवी होती, असं या तरुणांनी म्हटलं. तर फारच थोड्या जणांनी त्यापूर्वीच करायला हवं होतं, असं म्हटलं आहे.

सर्वे केलेल्यांपैकी बहुतांश जणांनी वयाच्या अठराव्या वर्षाच्या आधीच पहिल्यांदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले होते. तर निम्म्या जणांनी 17 वर्षं पूर्ण होण्याआधीच सेक्स केला होता. एक तृतियांश जणांनी 16 वर्षं पूर्ण होण्याआधीच शरीर संबंध ठेवले होते.

दोघांची सहमती

या सर्व्हेमध्ये शरीरसंबंधाची क्षमता किंवा त्याची तयारी याचीही माहिती घेण्यात आली. पहिल्यांदा सेक्स करणाऱ्या व्यक्तीची स्वतःची पुरेशी तयारी होती की नाही, या विषयी विचारण्यात आलं.

यावर निम्म्या तरुण मुली आणि दहापैकी चार तरुण मुलांनी नकारार्थी उत्तर दिलं.

 

पहिल्यांदा शरीर संबंध ठेवताना ते आणि त्यांच्या जोडीदाराची सेक्सची सारखी इच्छा नव्हती, असं जवळपास पाचपैकी एका मुलीने तर दहापैकी एका मुलाने म्हटले. याचाच अर्थ काहींवर सेक्ससाठी दबाव टाकण्यात आला होता.

Natsal सर्व्हेचे संस्थापक प्रा. काये वेलिंग्ज सांगतात की संमतीचे वय एखाद्याने सेक्च्युअली अॅक्टिव्ह होण्यासाठीचे निदर्शक नाही. "प्रत्येक तरुण व्यक्ती वेगळी असते. काही पंधरा वर्षाचे असतानाच तयार असतील तर काही अठरा वर्षांचे होऊनदेखील तयार नसतील."

सह-संशोधनकर्त्या असलेल्या डॉ. मेलिसा पाल्मर म्हणतात, "सेक्स करताना तरुण मुलांपेक्षा तरुण मुलींवर त्यांच्या जोडीदाराकडून दबाव येण्याची शक्यता जास्त असते, असं आमच्या निष्कर्षातून उघड होतं."

"या सर्व्हेमधून काही सकारात्मक बाबीही समोर आल्या आहेत. उदाहरणार्थ, दहापैकी नऊ तरुणांनी पहिल्यांदा सेक्स करताना काँडोमचा वापर केला. मात्र त्यानंतर नियमितपणे सेक्स करू लागल्यानंतर तरुणांच्या व्यापक आरोग्यहिताच्या रक्षणासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे."

शाळेत देण्यात येणाऱ्या लैंगिक शिक्षणात तरुणांचं संवाद कौशल्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे, जेणेकरून त्यांना पहिल्या सुरक्षित आणि सकारात्मक सेक्सचा अनुभव घेत यावा, असे त्यांचं मत आहे.

योग्य वेळ कोणती?

तुम्ही सेक्स करू शकता का, हे जाणून घेण्यासाठी हे काही प्रश्न स्वतःला विचारा :

- हे योग्य वाटतं का?

- माझ्या जोडीदारावर माझं प्रेम आहे का?

- तिचं/त्याचं माझ्यावरही तेवढंच प्रेम आहे का?

- SITs आणि HIV रोखण्यासाठी काँडोम वापरण्याविषयी आपल्यात बोलणं झालं आहे का? आणि हा संवाद परिणामकारक होता का?

- गरोदर राहणार नाही, यासाठी योग्य खबरदारी घेतली आहे का?

- कुठल्याही क्षणी मी 'नाही' म्हणू शकते/शकतो का, आणि तसं झाल्यास आम्हा दोघांनाही ते मान्य असेल का?

या सर्व प्रश्नांची तुमची उत्तर होकारार्थी असतील तर तुमच्यासाठी वेळ योग्य आहे.

मात्र खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं तुमचं उत्तर होय असेल तर मात्र तुमच्यासाठी वेळ योग्य नाही.

- जोडीदार किंवा मित्रांचा माझ्यावर दबाव आहे का?

- नंतर मला कुठल्याही प्रकारची खंत वाटू शकते का?

- केवळ मित्रांमध्ये 'कूल' दिसण्यासाठी, 'इम्प्रेशन' जमवण्यासाठी मी सेक्स करण्याचा विचार करत आहे का?

- माझा जोडीदार सोबत रहावा, केवळ याच कारणासाठी मी सेक्स करण्याचा विचार करत आहे का?

स्रोत : NHS Choices

सेक्च्युअल हेल्थ चॅरिटी ब्रुकचे इसाबेल इनमॅन म्हणतात, "तरुणांसाठी योग्य असलेले सकारात्मक निर्णय घेण्याची क्षमता तरुणांमध्ये निर्माण करण्यासाठी वय आणि पातळीनुरूप नातेसंबंध आणि लैंगिक शिक्षण (RSE) लवकर सुरू केले पाहिजे, यावर आमचा गाढ विश्वास आहे. बंधनकारक RSE सुरू केल्याने ही संधी मिळेल, अशी आम्ही आशा करतो."