गेल्या २४ तासांत २९४ पोलिसांना कोरोनाची बाधा

गेल्या २४ तासांत २९४ पोलिसांना कोरोनाची बाधा

मुंबई : राज्यभरात पोलिसांभोवती कोरोनाचे संकट वाढत आहे. गेल्या २४ तासांत २९४ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून तीन पोलिसांना जीव गमवावा लागल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यूचा आकडा १२१ वर गेला आहे.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांच्या अंमलबजावणीसह कोविड रुग्णालयाभोवती बंदोबस्त, दैनंदिन कामकाजाची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. अनलॉकच्या काळात राहदारी वाढली. नागरिकांशी संपर्क वाढल्याने पोलिसांभोवतीचे संकटही वाढताना दिसत आहे. राज्यभरात १२ ऑगस्ट पर्यन्त ११ हजार ३९२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात १ हजार १७९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ९११ अधिकाऱ्यांसह ९ हजार १८७ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. पोलिसांभोवतीचा कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढविणारा आहे. यात गेल्या २४ तासांत तब्बल २९४ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या २ हजार ८४ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत तीन पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. त्यामुळे मृत्यूचा आकडा १२१ वर पोहचला आहे. यातही मुंबई पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, ४० वयोगटापुढील पोलिसांचा जास्तीचा धोका दिसून आला. त्यामुळे त्यांच्या कामात विशेष नियोजन करण्यात यावे याबाबतही नमूद करण्यात आले होते.