सावधान! 10 राज्यांमध्ये वाढतोय कोरोना संसर्ग; केंद्र सरकारने दिल्या या सूचना

सावधान! 10 राज्यांमध्ये वाढतोय कोरोना संसर्ग; केंद्र सरकारने दिल्या या सूचना

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.  देशात 17 दिवसानंतर 40 हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. केरळमध्ये सलग चौथ्या दिवशी 20 हजाराहून अधिक रुग्णांचे निदान झाले आहे. शनिवारी केंद्र सरकारच्या टीमने केरळ अलप्पुझाचा दौरा केला. संसर्ग वाढण्याची कारणं जाणून घेतली. महाराष्ट्र आणि तामिळनाडूत देखील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होताना दिसत आहे. कर्नाटकने तर महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्या लोकांना कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र असणे बंधनकारक केले आहे. कर्नाटकमध्ये नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक 34 टक्के वाढ झाली आहे.

देशातील दहा राज्यांमधील कोरोना संसर्गाची किंचित वाढ लक्षात घेता. केंद्र सरकारने राज्यांना सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखील झालेल्या बैठकीत केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक,  तामिळनाडू, ओडिसा, आसाम, मिझोरम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मनिपूरचे परिस्थितीची समिक्षा करण्यात आली. या राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी रेट वाढला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार, या राज्यांमध्ये सर्विलांस वाढवणे, संसर्ग रोखण्यासाठी नियोजन करणे, ज्या राज्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांहून जास्त आहे. तेथे कडक निर्बंध लागू करणे, गर्दी न होऊ देणे, राज्यांमध्ये टेस्टिंग वाढवणे. या  बाबींवर गांभिर्याने अंमलबजावणी करण्यात यावी.