प्रत्येक गरजू रूग्णांस रूग्णवाहिका मिळावी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

प्रत्येक गरजू रूग्णांस रूग्णवाहिका मिळावी  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर,दि.10: ग्रामीण भागात 108 व इतर रूग्णवाहिका आहेत. मात्र त्या वेळेत पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांना वैद्यकीय सेवा त्वरित मिळावी. प्रशासनाने प्रत्येक गरजू रूग्णांस रूग्णवाहिका मिळावी, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

            आरोग्य विभागाच्या विविध बैठकांदरम्यान श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, लसीकरणांशी निगडीत शासकीय आणि खाजगी दवाखान्यांचे प्रतिनिधी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, समितीचे सदस्य उपस्थित होते.

            यावेळी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची सुकाणू व संनियंत्रण समिती, नियमित लसीकरण, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि आपत्कालिन वैद्यकीय सेवा समितीचा श्री. शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.

            श्री. शंभरकर म्हणाले, रूग्णवाहिकांचा वापर पूर्ण सॅनिटायझर करून करा. रूग्णवाहिकेबाबत नागरिकांच्या तक्रारी येता कामा नयेत, याची खबरदारी घ्या. रूग्णवाहिका वाढविण्यावर भर द्या. मातृ वंदना योजनेचे काम ग्रामीण भागात चांगले झाले आहे. नागरी भागातील लक्ष्यही त्वरित पूर्ण करा. गरीब रूग्णांपर्यंत पोहोचून त्यांना योजना समजावून द्या. एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी यंत्रणेने प्रयत्नशील रहावे. याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम जनतेपर्यंत पोहोचवा. यासाठी नेहरू युवा केंद्राची मदत घ्या. तरूणांमध्ये जागृती करा.

            लसीकरणाबाबत श्री. शंभरकर म्हणाले, सध्या सर्व भर कोविडवर असला तरी नियमित लसीकरण योग्य खबरदारी घेऊन करणे गरजेचे आहे. लहान मुलांवर भर द्या. गरोदर माता, बालके यांची काळजी घ्या. अनुभव संपन्न अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी प्रयत्न करावेत.

            राज्य वैद्यकीय अधिकारी अमोल गायकवाड यांनी सादरीकरणाद्वारे लसीकरणावर भर देण्याचे आवाहन केले. बफर आणि कंटेन्मेंट झोनमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून लसीकरण घ्या. 65 वर्षांवरील नागरिकांनी बाळाला लसीकरणाला घेऊन येऊ नये, याबाबत सूचना द्या. मिझल्स-रूबेला लसीबाबतही आढावा बैठका तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

            जिल्ह्यात 108 च्या 35 रूग्णवाहिका असून यापैकी 19 कोविड रूग्णांसाठी तर 16 नॉन कोविड रूग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. कोविड काळात 15934 रूग्णांना याद्वारे सेवा देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

माता बाल संगोपन अधिकारी एस.पी. कुलकर्णी यांनी मातृ वंदना योजनेबाबत माहिती दिली. जिल्ह्यात 88 टक्के लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सर्वात जास्त पंढरपूर तालुक्यात 102 टक्के, उत्तर सोलापूर 99 टक्के, दक्षिण सोलापूर 94 टक्के, माढा 90 टक्के काम झाले आहे. सर्वात कमी मोहोळ 75 टक्के, अक्कलकोट 83 टक्के, मंगळवेढा, बार्शी आणि करमाळा 84 टक्के, सांगोला आणि माळशिरस 85 टक्के काम झाले आहे. नगरपरिषद भागात मंगळवेढ्यात एकही नोंदणी नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. आधारकार्ड जुळत नसल्याने 3270 जणांना लाभ देता आला नाही, त्यांचे आधारकार्ड पुन्हा नोंदणीचे काम सुरू असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.