गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या कामाला गती यावी, धनंजय मुंडे यांच्या मॅरेथॉन बैठका

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या कामाला गती यावी, धनंजय मुंडे यांच्या मॅरेथॉन बैठका

मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी गुरुवारचा दिवस मॅरेथॉन बैठकींचा ठरला. राज्यातल्या विविध प्रश्नांवर आणि महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या. दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामाला गती द्यावी तसेच संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मंत्रालयात बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले.महामंडळाचे मुख्य कार्यालय पुणे व परळी येथे सुरू होणार आहे, कामगारांची नोंदणी संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद यांच्या समन्वयाने गावस्तरावर तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत करण्यात येईल. तसेच यासाठी साखर कारखान्यांकडूनही माहिती मागविण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महामंडळास मुख्य अधिकारी व अन्य आवश्यक कर्मचारी नेमावेत, प्रस्तावित शरद आरोग्य वाहिनी, ऊसतोड कामगार अपघात विमा आदी योजनांचा प्रस्ताव मंजुरासाठी लवकर सादर करावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेत या वर्षीपासून आणखी 50 जागा वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. फाईन आर्ट्स, फिल्म मेकिंग, डिझाईन आदी कला विषयांमध्ये उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालये 300 क्यूएस रँकिंगमध्ये येत नाहीत, त्यामुळे त्यांचे सब्जेक्ट रँकिंग ग्राह्य धरण्यात येऊन लाभ देण्यात येईल. या योजनेची निवडप्रक्रिया ऑनलाईन करण्याची कार्यवाही सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले. बैठकीस राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.