एटीएमला हात न लावता पैसे काढणे होणार शक्य

मोबाइलवरील क्यूआर कोडने होणार व्यवहार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी प्रयत्न

एटीएमला हात न लावता पैसे काढणे होणार शक्य

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या संकटाने सारे जग त्रासून गेले आहे. संसर्ग टाळण्यासाठी सगळ्या देशांमध्ये खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत. बँका तसेच एटीएममध्येही त्या पाळल्या जात आहे. परंतु यापुढे एटीएममध्ये हाताचा स्पर्श न करता सहज आणि सुरक्षितपणे पैसे काढणे ग्राहकांना शक्य होणार आहे. देशातील मोठ्या बँका लवकरच स्पर्श न करता पैसे काढता येतील, अशा एटीएम मशिन्स घेऊन येण्याच्या तयारीत आहेत.

एटीम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजी या कंपनीने असे एटीएम तयार केले आहे. यातून ग्राहक मोबाइल अ‍ॅपद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढू शकतात. सध्याच्या एटीएम कार्डमध्ये एक मेग्नेटिक स्ट्रीप असते. त्यात ग्राहकांची सर्व माहिती असते. मशिनमध्ये कार्ड टाकताच ही माहिती वाचली जाते व पिन नंबर टाकल्यानंतर ग्राहकाला पैसे काढण्याची परवानगी दिली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या नव्या एटीएममधून पैसे काढताना मशिनवर दिलेला क्यूआर कोड मोबाइल अ‍ॅपद्वारे स्कॅन केल्यानंतर काढावयाची रक्कम मोबाइलवर टाकावी लागते. तितक्या रकमेचे पैसे एटीएम मशिनमधून बाहेर येतात. यात एटीएम मशिनला स्पर्श करावा लागत नाही.

क्लोनिंगचा धोका नसल्याचा दावा
या मशिनची माहिती देताना एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीचे सीटीओ महेश पटेल म्हणाले की, क्यूआर कोडद्वारे पैसे काढणे खूप सोपे आणि सुरक्षित आहे. यात कार्ड क्लोनिंगचा धोका नाही. रक्कम काढण्यासाठी केवळ २५ सेकंद लागतात. एटीएमला हात न लावता मोबाइलवरील क्यूआर कोडचा वापर करून पैसे काढता येणार असल्याने कमी वेळात रक्कम हातात पडते.