महिलेचा खून करून अर्धवट मृतदेह तलावात फेकला

महिलेचा खून करून अर्धवट मृतदेह तलावात फेकला

कोल्हापूर - अंदाजे साठ वर्षीय अज्ञात महिलेचा निर्घृण खून करून तिचा अर्धवट मृतदेह राजाराम तलावात फेकून दिल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आलै. हा मृतदेह एका पिशवीत होता. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या फक्त कमरेच्या खालचा भाग असल्याने त्यावरून खून झालेल्या महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरू केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजाराम तलाव परिसरात आज सकाळी मॉर्निंग वॉक ला आलेल्या नागरिकांना एका पिशवीत मृतदेहाचे काही अवशेष असल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, उपनिरीक्षक समाधान घुगे आदी पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पिशवी बाहेर काढल्यानंतर त्यात महिलेचा अर्धवट मृतदेह मिळून आला. महिलेचा खून करून तिचा अर्धवट मृतदेह पाण्यात फेकल्याचे स्पष्ट झाले.

घटनेचे गांभीर्य पाहून घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठविला आहे. ही महिला ६० वयोगटातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तिची ओळख पटवल्यानंतरच खूनाचा प्रकार उघडकीस येईल. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम राजारामपुरी पोलिस ठाण्यात सुरू आहे.