नागपुरात मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपुरात मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूर : क्राईम कॅपिटल होत असलेल्या नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. घरातून निघून गेलेल्या अल्पवीय मुलीला एका ऑटो चालकाने मदत करण्याच्या बहाण्याने रुमवर नेत आपल्या मित्रांसोबत सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटे मोमीनपुरा जवळ मेयो रुग्णालयाच्या समोर पीडित मुलीला सोडून नराधमांनी पोबारा केला. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले असून दोघेजण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या संदर्भात सविस्तर वृत्त असे, की शहरातील एक मुलगी गुरुवारी रात्री घरातून निघून जाऊन रेल्वे स्टेशन जवळच्या मानस चौकात आली होती. तिला नाशिकच्या दिशेने जायचे होते. मानस चौकात लोखंडी पुलाजबळ तिला एका ऑटो चालकाने मदत करतो असे खोटे सांगून आपल्या मोमीनपुरा परिसरातल्या रूमवर नेले आणि तिथे आपल्या इतर ऑटो चालक मित्र आणि रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करणाऱ्या मित्रांना बोलावले. त्या रूममध्ये चौघांनी तिच्यावर रात्री आळीपाळीने बलात्कार केला. नंतर शुक्रवारी पहाटे मोमीनपुरा जवळ मेयो रुग्णालयाच्या समोर सोडून दिले.

शुक्रवारी पहाटे ती मुलगी रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना दिसली. तेव्हा मुलीने तिला नाशिकला जायचे आहे हे सांगितले. त्यामुळे त्यांनी तिला नागपूर रेल्वे स्थानकावर सोडले. तिकीटही घेऊन दिलं. रेल्वे स्टेशनवर एकटी बसलेली आढळल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी ती अल्पवयीन असल्याने तिला शुक्रवारी सकाळी चाईल्ड लाईनच्या हवाली केले. शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवस ती चाईल्ड लाईनकडे राहिली. शनिवारी तिने चाईल्ड लाईनच्या अधिकाऱ्यांना तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली. आधी लोहमार्ग पोलिसांनी (रेल्वे स्टेशनवरील पोलीस ठाणे) तिची चौकशी केली. त्यानंतर आता सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी या घटनेचा मुख्य आरोपी (ऑटोचालक) आणि आणखी एकाला ताब्यात घेतले असून इतर दोघे पळून गेले आहेत.