यश मिळवण्यासाठी कल्पकता व डोके शांत पाहिजे

यश मिळवण्यासाठी कल्पकता व डोके शांत पाहिजे

चीनमधील एक प्रसिध्द दंत कथा आहे, एक क्रूर सम्राट राजा चुंग लुई , चीन मधील एका मागून एक लहान राज्ये काबिज करतो, तुम्ही मला शरण या नाही मरायला सामोरे जा असा त्याचा निर्णय असे. काही छोट्या राजानी  लढून प्राण गमावले तर काही जीवाच्या भीतीने शरण येऊन गुलाम झाले, जेव्हा चुंग लुईचे आक्रमण मींगझु या राणीच्या राज्याच्या सीमेवर येऊ ठेपले, तेव्हा राणी मिंगझुला काय करावे सुचेना, इतक्या बलाढ्य राजासमोर आपला टिकाव लागणार नाही, आपले राज्य वाचवायचे कसे याची तिला चिंता लागली. तिला एक शक्कल सुचली व एक पत्र तिने चुंग लुईला पाठवले. राजे तुम्ही इतके ताकदवान , आम्हाला सहज जिंकून  आमचा अस्त सहज करू शकता पण त्यात तुमचा खूप मोठा तोटा आहे. माझ्या राज्यामध्ये खूप मोठ्या सोन्याच्या हिर्‍याचा खजिना आहे, खजिना अनेक ठिकाणी पुरून ठेवला आहे, तुम्ही जर आम्हाला मारून टाकले तर हा खजिना कोठे आहे तुम्हालाच कळणार नाही. आम्ही तुम्हाला जरूर शरण येऊ पण त्यापूर्वी राज्यातील सर्व खजिना कोठे लपवला आहे ह्याचा नकाशा तुम्हाला दाखवायचे आहे ,त्यानंतर तुम्ही मला खुशाल मारा किंवा दया करा. मग एका तंबूत बैठक ठरली. तंबूत दोघेच असतील सर्व सैनिक बाहेर असतील. राणी गुप्तधनाचा नकाशा राजाला एकट्यालाच दाखवेल असे ठरले. राणी नकाशा घेवून तंबूत आली तो गोल गुंडाळलेला होता. तिने तो टेबलावर ठेवला व हळूहळू उघडू लागली, राजाची उत्सुकता वाढीस लागली, किती खजिना मिळतोय ह्या विचाराने आनंदी झाला होता. पण चाणाक्ष राणीने त्या नकाशात धारधार तलवार लपवून आणली होती, नकाशा उघडताच राणीने तलवार काढली व राजाच्या ध्यानीमनी नसताना त्याचे धड व मुंडी वेगळी करुन वध केला. सगळीकडे आहा:कार माजला, सैन्य पळू लागले राणीच्या सैन्यांनी हल्ला चढवून सैन्य पळवून लावले व अशा रीतीने राणी मींगझुने आपले राज्य वाचवले. आज मराठी माणसाकडे मोठे भांडवल नाही, खूप चांगले शिक्षण नाही, अनुभव नाही उद्योग व व्यवसाय करायचा म्हंटलं तर  बलाढ्य भांडवलदार याच्यांशी स्पर्धा आहे. तेव्हा आपण आपला उद्योग शांत डोक्याने अशा कल्पक आयडिया शोधून, चाणाक्षपणे गनिमीकाव्याने विजय मिळविण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने बलाढ्य शत्रूची बोटे तोडली व कोथळा काढला तसे मराठी माणसाने कमी भांडवलात, मनुष्यबळात आपला उद्योग व्यवसाय कसा चालविता येईल व बलाढ्य स्पर्धकाला कसे गनिमीकावा व कल्पक वृत्तीने डोके चालवून एकीने नामोहरम करून  बाजारपेठ काबीज करता येईल हे पाहिले पाहिजे. डोके शांत ठेवले तरच ते चालेल व आयडिया सुचतील. मराठी माणसाने भडकाऊ न बनता, शांत व चाणाक्ष बनले पाहिजे. भडकणारा दुसर्‍याकडून वापरला जातो तर शांत राहणारा डोकेबाज राज्य करतो .  देशाच्या उद्योग विश्वावर मराठी माणसाचे राज्य आले पाहिजे.
जो चूक करतो तो माणूस... तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस... जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस... ज्याला आपण विझडम (Wisdom) प्राप्त होणे असे म्हणतो.  या लेख मालिकेद्वारे आपणास विझडम प्राप्त होण्यास मदत होईल.

वाचक मित्रहो, आमचे लेख आवडल्यास लाईक व कमेंट करा उत्कृष्ट कमेंटला मी लिहिलेले "उद्योजकता" पुस्तक भेट म्हणून दिले जाईल. आपले प्रश्न, प्रतिक्रिया यांचे आम्ही जरूर स्वागत करतो.

© प्रकाश भोसले
व्हॉट्स अप क्रमांक : ९८६७८०६३९९

#entrepreneur #business #motivation #success #entrepreneurship #smallbusiness #entrepreneurlife #marketing #money #startup