विदर्भात ऑगस्ट महिन्यातही पाऊस सामान्यच, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

विदर्भात ऑगस्ट महिन्यातही पाऊस सामान्यच, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

नागपूर : एकीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात वरुणराजा धो-धो बरसत असताना विदर्भात सर्वसाधारण पाऊस झाला असल्याने अनेक जलाशये अजून भरलेली नाहीत. अशा परिस्थितीत  ऑगस्ट महिन्यात सामान्य पाऊस होईल अशी भविष्यवाणी हवामान खात्याने केल्यामुळे सिंचन विभागाची चिंता देखील वाढू शकते. विदर्भात जून आणि जुलै महिन्यात सामान्य पावसाची नोंद झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्यातसुद्धा सामान्यच पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. याामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे. 

विदर्भात यावर्षी निर्धारीत वेळेच्या तब्बल आठ दिवस आधीच मान्सून दाखल झाला होता. मात्र त्यानंतर पाऊस सातत्याने नसल्याने वातावरणातील आर्द्रता कमी जास्त होत आहे. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात जून महिन्यात पावसाची टक्केवारी कमीच असते, त्यानंतर मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात विदर्भात दमदार पाऊस कोसळतो. मात्र या वर्षी जुलैनंतर ऑगस्ट महिन्यात सुद्धा सामान्यच पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केल्याने पावसाचा अनुशेष वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भाच्या अनुषंगाने जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने पावसाळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असतात. याच काळात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असते. मात्र ऑगस्ट महिन्यातही सामान्य पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांनाच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये येणाऱ्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये सरासरी 96 टक्के पाऊस झाला. त्यामुळे पाणीबाणी करणाऱ्या नाशिककरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पावसाने जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात दमदार हजेरी लावली असली तरी पूर्व भागातील काही तालुक्यांची मात्र अद्यापही निराशा आहे. चांदवड तालुक्यात सर्वात कमी 40 टक्के तर मालेगावात 51 टक्केच पाऊस झाला. त्यामुळे पुढील दोन महिन्यात या तालुक्यांमध्ये पाऊस समाधानकारक पडतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.