१२ वी पर्यंत शिक्षण, संगोपन एवढीच पालकांची जबाबदारी

Hpn

१२ वी पर्यंत शिक्षण, संगोपन एवढीच पालकांची जबाबदारी
प्रकाश भोसले

 

सध्य स्थिति :
आज महाराष्ट्रातून कितीतर तरुण, विद्यार्थी, पालक मला संपर्क साधत आहेत, अनेक प्रश्न विचारत आहेत. मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पालक आपल्या मुलांना पदवी, पदव्युत्तर आणि त्यानंतर काही/कित्येक वर्षे कमाईविना फुकट संभाळत आहेत आणि हे पालक गडगंज श्रीमंत नसून साधे नोकरदार वा शेतकरी आहेत. मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण (१७ वर्षे ); नोकरी लागण्यासाठी प्रयत्न व काही वर्षे (३ ते ५ वर्षे); विवाह ठरवणे व करून देणे (२ ते ३ वर्षे); हे सगळं करेपर्यंत पालकांचे वय मरणाला जाऊन टेकते.

नोकरदार :
सर्वसाधारण मुलं जेव्हा पदवीधर होतात तेव्हा पालकांचे वय ५० असते, त्याबरोबरच घर बांधकाम करतात. मुलं नोकरीला लागतात तेव्हा पालकांचे वय ५५ वर्षे असते. मुलांची लग्न होऊन सुना व जावई येतात तेव्हा वय ६० ओलांडलेले असते. वयाच्या ६० झाल्यानंतर अनेक आजार व आरोग्याचे प्रश्न सुरू होतात. औषध पाण्यावर खर्च होऊ लागतो. घर बांधले त्याचे हफ्ते फेडले… २० वर्षे मुलांना शिक्षण दिले… नोकरी लावली... लग्न केली... जो पगार येतो त्यातला ५% सुद्धा स्वत:च्या व धर्मपत्नीच्या सुखासाठी उरला नाही... ज्या धर्मपत्नीने आपल्याला आयुष्यभर साथ दिली तिला आपण कधी हॉटेलला जेवायला घेऊन गेलो नाही… तिच्या वाढदिवसाला पार्टी केली नाही… कुठे थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनाला घेऊन गेलो नाही... हे वयाच्या ६० व्या वर्षी लक्षात येतं.

ज्यांच्यासाठी केले :
मला एक डॉक्टर मित्राने मला एक भयानक वास्तव सांगितले. महाराष्ट्रात ५०% हून अधिक वृद्ध लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांना सर्जरी करण्यासाठी ३ लाख रूपये खर्च आहे. परंतु त्यांची मुलं त्यांना पैसे देत नसल्याने तसे उपचार होत नाहीत. म्हातारा म्हातारी एक दोन वर्षात मरणारच आहेत तर कशाला खर्च करायचा? असा मुलांचा विचार असतो. एकाच मुलाने व कोणत्या मुलाने पैसे घालायचे? हा प्रश्न असतो. आज बऱ्याच ठिकाणी बघतो, वृद्ध व्यक्तीच निधन झालेनंतर १३ वा दिवस ५ व्या दिवशीच उरकला जातो. कारण मुलांना नोकरीमुळे १३ दिवसाची सुट्टी मिळत नाही. त्यामुळे १३ व्या चा कार्यक्रम ५ व्या दिवशी उरकतात. ज्या मुलांसाठी पूर्ण आयुष्य वेचले, त्यांच्याकडे तुमच्या पश्चात १३ दिवस ही वेळ नाही? तुमच्या निधनानंतर केवळ १५ दिवसाच्या आत संपत्तीची वाटणी होते.

स्वत:चे आयुष्य :
पालकांना माझे एवढेच सांगणे आहे की, प्रथम स्वत:चे आयुष्य जगा. तुमच्या ऐपतीनुसार मुलांना फक्त १२ वी पर्यंतचे शिक्षण द्या, त्यानंतर पार्टटाइम नोकरी व व्यवसाय करून शिक्षण व जगण्याएवढा पैसा स्वत: कमवण्यास सांगा. ऐतखाऊ सवय तुम्ही लावली तर तुम्ही स्वत: तुमच्या कुटुबाचा सर्वनाश करीत आहात, हे लक्षात घ्या. उतारवयामध्ये आजाराला सामोरे जावे लागू नये यासाठी आतापासूनच चांगला आहार घ्या. स्वत:चा जीव मारून मुलांची शिक्षण, घर, लग्न, नोकऱ्या करू नका. १२ वी नंतरच तुमच्या मुलांना काम करण्याची सवय लागली की त्याला जग, पैसा, मेहनत यांचे महत्व कळेल. आयते बसून खायला घातले तर तो पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे केवळ मांसाचा गोळाच होईल. उलट त्याला व्यवसायाच्या जगात लवकर सोडले तर तो गरुडाप्रमाणे ताकदवान, शूर, चपळ, चाणाक्ष व स्वावलंबी होईल, १८ वर्षे पूर्ण झालेला देश चालवू शकतो मग स्वत:च आयुष्य का नाही ?

प्रिय वाचक हो, आमच्या फेसबुक पेजवर लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चांगल्या माहितीपूर्ण विचारदर्शक कमेंट्स ज्या वाचकांसाठीही फायद्याच्या असतील अशा कमेंट्सपैकी उत्कृष्ट कमेंट करणाऱ्या एका वाचकास प्रकाश भोसले लिखित 'उद्योजकता' पुस्तकाची प्रत मोफत दिली जाईल.

सूचना :- एका दिवशी एक सर्वोत्तम कमेंट निवडली जाईल. ही सुविधा मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी संपर्क करा: ८३५५९७९२३२

लेख फेसबुक वरून संकलित