रुपये ७५०/- पगार ते नामवंत इंजिनियरिंग कंपनीच्या फायनान्स डायरेक्टर... सुनिल रुपनर या माणदेशी ग्रामीण तरुणाची कथा...

Hpn

रुपये ७५०/- पगार ते नामवंत इंजिनियरिंग कंपनीच्या फायनान्स डायरेक्टर... सुनिल रुपनर या माणदेशी ग्रामीण तरुणाची कथा...

ऑनलाईन /डिस्टन्स एज्युकेशन घेवूनसुध्दा उज्वल करिअर... 

 

रुपये ७५०/- पगार ते नामवंत इंजिनियरिंग कंपनीच्या फायनान्स डायरेक्टर... सुनिल रुपनर या माणदेशी ग्रामीण तरुणाची कथा... 

 

एक गाव- मु. पो. मेडशिंगी ता. सांगोला (जि. सोलापूर)... दुष्काळ पाचवीलाच पूजलेला... गावातच सुनीलने १० वी पर्यंतचे शिक्षण घेतले… पुढे तालुक्याचे ठिकाणी १९९५ ला १२ वी पर्यंत शिक्षण झाले… पुढे काय...? दुष्काळी भाग शेतीत काय पिकत नाय, पुढ शिकायला पैसे नाहीत, धरली वाट पुण्याची… पुण्यात एका इंजिनीअरींग कंपनीत काम सुरू केले. सांगेल ते काम करत, पगार रुपये ७५०/-. पुढे वाढत जाऊन ३०००/- झाला पैकी भावाला १२००/-पाठवत असे.  आज भाऊ पुण्यात नामवंत कॉलेजला प्राध्यापक झाला आहे. भाऊ एकदा सुनीलला भेटायला आला होता तेव्हा तो  कंपनीच्या साहेबांची गाडी धुवत होता. ते पाहून भाऊ गळ्यात पडून रडू लागला. पुण्यात आल्यावर दोन वर्ष सायकल वापरली, नंतर टू-व्हीलर चालवायला शिकला, पुढे टेम्पोही चालविला. जेवणाचे डबे आणणे, कपबशी उचलणे, ऑफिसची देखरेख करणे, कागदपत्रांची ने-आण करणे, आले-गेलेल्यांना चहापाणी, नमस्कार करणे... पण प्रामाणिकपणे मेहनत करणे, प्रत्येकाला नमस्कार करणे, साहेब म्हणणे, ओळखी वाढविणे व प्रत्येकाकडून काही नवीन शिकता येतंय का ते पाहत राहणे. आपलासुद्धा एक दिवस येणार हा मनात मात्र विश्वास होता. कामाच्या निमित्ताने अनेक लोकांशी संपर्क येत असत. लक्षात आलं की, पुढचं उच्च शिक्षण घेतलं तरच आपली प्रगती होणार. पुढे डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून पुणे विद्यापीठात BBA ला प्रवेश घेतला. जसा कामातून वेळ मिळेल तसा अभ्यास सुरू केला. अभ्यास करताना लक्षात आले की, आपण जे रोज कंपनीत काम करतो तेच मॅनेजमेंटच्या पुस्तकात आहे, नवीन काही नाही. आपल्याला तर सगळंच येतंय कारण आपण रोज तेच काम करतोय. दरम्यानचा काळात कंपनीमध्ये ‘चीफ फायनान्स अकाऊंट मॅनेजर’ म्हणून बढती झाली. कामाचा आवाका वाढला, अनुभव वाढला. तसे ध्यानात आले की, अजून आपल्याला पुढे जायचे असेल तर MBA केले पाहिजे. पुणे विद्यापीठातून यशस्वीपणे फर्स्ट क्लासमध्ये MBA पूर्ण केले, दरम्यान ‘जनरल मॅनेजर – फायनान्स’ पदावर पदोन्नती झाली. कंपनीसाठी घेत असलेली मेहनत, स्वत:चा चाणाक्षपणा, शिकण्याची प्रवृत्ती व उद्योग क्षेत्रात अनेकांशी संबध प्रस्तापित करण्याचे कौशल्य यामुळे कंपनीने त्यांची ‘डायरेक्टर’ पदावर नियुक्ती केली. ही गोष्ट आहे सुनील रूपनर या तरुणाची... ज्याला १९९५ साली १२ वी झालेवर प्रश्न पडला होता की, गावात दुष्काळ, घरची गरीबी, पुढे शिक्षणाला पैसे सोडा इथं रोजच्या भाकरीचे वांदे… फक्त पुण्याला पोहचण्यापुरते काही पैसे खिशात घेवून आलेला तरुण ! अजून एक आठवण सुनिलजी सांगतात, इयत्ता १२ वीत परीक्षेचा फॉर्म भरायलाही पैसे नसल्यामुळे त्यांना गॅप घ्यावा लागला. ही गोष्ट त्यांच्या एका शिक्षकाला समजल्यानंतर सुनीलचे शिक्षण बंद पडू नये म्हणून त्यांनी त्याची फी भरली. सुनीलने काही महिन्यांनी थोडे थोडे पैसे करून त्या पैशांची परतफेड केली.

 

१) ही गोष्ट त्या मुलांसाठी आहे, ज्यांनी आई बापाचे BE, MBA करण्यासाठी १०-१५ लाख खर्च करविले व आता नोकरी, धंदा नाही म्हणतात. 

 

२) ही गोष्ट त्या मुलांसाठी आहे, ज्यांनी पैसे नाहीत, अमुक संस्थेत प्रवेश मिळाला नाही म्हणून मधूनच शिक्षण सोडून गरिबीला दोष देतात.

 

३) ही गोष्ट त्या पालकांसाठी आहे, जे कर्ज काढून, जमिनी विकून आंधळेपणाने मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात. 

 

४) ही गोष्ट त्या अडाणी लोकांसाठी आहे, ज्यांनी हे माहीत नाही की शिक्षण काय फक्त चार भिंतीच्या आत नव्हे तर शाळेच्या बाहेरही आहे. 

 

५) ई-लर्निंग, डिस्टन्स एज्युकेशन या  नव्याने शिक्षण क्षेत्रात आलेल्या क्रांतीचा मुलांनी, पालकांनी फायदा घ्यावा व माहिती व्हावी म्हणून यासाठी  लेखांचा प्रपंच.

 

६) आज सायकलवर १२ वी पर्यंत शिक्षणात आडकलेल्या मुलांना सुनील प्रमाणेच सायकल ते कारपर्यंत, रुपये ७५०/- पगार ते कंपनी डायरेक्टर, १२ वी शिक्षण ते ‘MBA - Finance’ असा प्रवास करण्याची प्रेरणा ग्रामीण मुलांना मिळावी.

 

हा लेख सुनील यांचेशी माझ्याशी झालेल्या  मैत्रीपूर्ण चर्चेवर आधारित आहे, ग्रामीण तरुणांना काही प्रेरणा मिळावी हा हेतू आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. 

 

आपला 

प्रकाश भोसले

उद्योग व करिअर विषयक लेखक.

https://bit.ly/373WQ5t