कार्तिकी एकादशीमध्ये देखील स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे बहुमोल योगदान

विद्यार्थ्यांनी केले वारकऱ्यांवर औषधोपचार व मार्गदर्शन

कार्तिकी एकादशीमध्ये देखील स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे बहुमोल योगदान

पंढरपूर- स्वेरीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान हे राज्याला माहितच आहे. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक, क्रीडा, विधायक आदी सांघिक उपक्रमात देखील स्वेरीचे विद्यार्थी उस्फुर्तपणे सहभाग घेत असतात. हे पाहून प्रशासन देखील स्वेरीला विविध उपक्रमासाठी पाचारण करत असते. यामध्ये स्वच्छता अभियान असो, निर्मल वारी असो, पोलीस मित्र बनून दर्शन रांगेतील  वारकऱ्यांना मार्गदर्शन करायचे असो, स्वच्छतेविषयी मार्गदर्शन असो हे सर्व स्वेरीचे विद्यार्थी तन मन धनाने सामाजिक कार्यात झोकून देतात आणि कार्य पार पाडतात. याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो. 

        नेहमीप्रमाणे यंदा देखील आषाढी वारीप्रमाणे कार्तिकी वारीला स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला मदत केली असून या मदतीमुळे पोलीस प्रशासनावरील भार थोड्या प्रमाणात का होईना स्वेरीतील विद्यार्थ्यांमुळे हलका झाला आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात सहभाग घेताना कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने स्वेरी संचलित डी फार्मसीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी. पी. रोंगे व स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने व प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर शहरात छत्रपती शिवाजी चौक, अंबाबाई पटांगण, चंद्रभागा एसटी स्टँड, नवीन एसटी स्टँड व गौतम विद्यालय या प्रमुख पाच ठिकाणी स्वेरी संचलित डी. फार्मसीमधील जवळपास साठ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कार्तिकी वारीत येणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्यासंबंधी औषधे देवून त्यांच्यातील पायी चालल्यामुळे पायाला होणाऱ्या वेदना कमी करून वारकऱ्यांच्या तब्येतीची काळजी घेतली. तसेच शहरातील विविध मठ, दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, निवास स्थान, भोजन व्यवस्था, मंदिरे, नदी आदी वारकऱ्यांसाठी अपरिचित असणारी महत्वाची ठिकाणे याबाबत वारकऱ्यांना व भाविकाना मार्गदर्शन केले. स्वेरीतील विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे मंदिर समिती आणि पोलीस प्रशासनाला बहुमोल मदत झाली. यामुळे प्रशासनाबरोबरच नागरिकांनी देखील स्वेरीतील विद्यार्थ्यांची पाठ थोपटली तर स्तुत्य कार्यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.