'उद्योजकता ही काळाची गरज!' -मसीआचे सचिव अर्जुन गायकवाड

'उद्योजकता ही काळाची गरज!' -मसीआचे सचिव अर्जुन गायकवाड

पंढरपूर- "जागतिक स्तरावरती बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन भारतामध्ये उद्योजक निर्माण होण्याची नितांत गरज आहे. यासाठी नोकरी करून कामगार बनण्यापेक्षा स्वतःचा उद्योग उभारून मालक बना." असे प्रतिपादन मसीआ (मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड ऍग्रीकल्चर)चे सचिव तथा जिजाई इंडस्ट्रीज, औरंगाबादचे संचालक अर्जुन गायकवाड यांनी केले. स्वेरी चे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली  मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाकडून आयोजित केलेल्या ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. यावेळी उद्योजक बनण्यासाठी  आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी व तांत्रिक बाबी यांवर त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. पुढे बोलताना ते म्हणाले, 'सध्याच्या जगात कौशल्य प्राप्त करून स्वतःचा उद्योग स्थापन करून त्याद्वारे इतरांना नोकऱ्या देणे हा येणाऱ्या अभियंत्यांच्या पिढीचा भव्य दृष्टिकोन असावा. याकरिता आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी जसे संयम, दूरदृष्टी , सर्वसमावेशकता इत्यादी महत्वाचे गुण आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत.' असे सांगून सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या पासून ते उत्पादन बनवणाऱ्या कंपन्यांची संपूर्ण माहिती व त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी तसेच राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या असणाऱ्या शासकीय योजनांबाबत ही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट हा प्रॉडक्ट बनला पाहिजे यासाठी त्यांनी पुढे मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन नव उद्योजकांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करून जागतिक बाजारपेठेत व्यापार करण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्याचा पुरेपूर फायदा हा उद्याच्या अभियंत्यांनी घ्यावा. त्यासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करून उद्योग क्षेत्रात पाऊल टाकून सुरुवात करावी. विद्यार्थ्यांनी नवीन उद्योग  उभारण्यासाठी  असणाऱ्या अडचणींबाबत  प्रश्न विचारले  असता त्यांनी अतिशय समर्पक उत्तरे दिली. हा वेबिनार यशस्वी  करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. संदिप वांगीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात,  प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, प्रा. दिग्विजय रोंगे, डॉ. सचिन सोनवणे, प्रा. दिगंबर काशीद, प्रा. कुलदीप पुकाळे, प्रा. संदीप साळुंखे, प्रा. सचिन गवळी,  प्रा. सुभाष जाधव, प्रा. भास्कर गायकवाड, प्रा. विक्रम चव्हाण, प्रा. सचिन खोमणे, प्रा. रामेश्वर सोळगे, प्रा. सचिन काळे,  प्रा.चेतन जाधव,  प्रा.कपिल जुंधळे,  प्रा.अमित शिंदे यांनी प्रयत्न केले.