स्वेरीचे माजी विद्यार्थी वीरकुमार शिंदे-पाटील यांचे रेल्वे परीक्षेत यश

स्वेरीचे माजी विद्यार्थी वीरकुमार शिंदे-पाटील यांचे रेल्वे परीक्षेत यश

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामधून उत्तीर्ण झालेले वीरकुमार रामचंद्र शिंदे-पाटील यांची रेल्वेने ‘परंमनंट वे इन्स्पेक्टर’ या पदाकरिता घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांची सोलापूर विभागात निवड करण्यात आली आहे. स्पर्धा परिक्षांसोबतच आता रेल्वेच्या परीक्षेत देखील स्वेरीचे विद्यार्थी यशस्वी होत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
          वीरकुमार रामचंद्र शिंदे-पाटील (रा.अकलूज, ता.-माळशिरस) यांचे प्राथमिक शिक्षण सदाशिवराव माने महाविद्यालयात झाले तर अकलूजच्याच शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात प्रवेश घेण्याचे अगोदरच निश्चित केलेले होते. त्याप्रमाणे त्यांनी स्वेरीतच प्रवेश मिळविला. शिक्षणासाठी तब्बल चार वर्षे  स्वेरीच्या वसतिगृहात राहून अभ्यास सुरू केला. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘कमवा आणि शिका’ योजनेचा देखील त्यांनी सलग चार वर्षे फायदा घेतला. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाद्वारे त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश कसे मिळवायचे आणि त्यासाठी कसे परिश्रम करायचे याची माहिती घेवून अभ्यास सुरु केला. अभियांत्रिकीची पदवी २०१४ साली उत्तीर्ण घेतल्यानंतर शिंदे पाटील यांनी रेल्वेची परीक्षा देण्याचे ठरवले ‘परमनंट वे निरीक्षक’ या पदाकरिता त्यांनी ऑगस्ट २०१९ रोजी परीक्षा दिली होती. त्यानंतर मे आणि ऑगस्ट या दोन महिन्यात दोन परीक्षा झाल्या. त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये रेल्वेने मेडिकलची परीक्षा घेतली. त्यातही ते उत्तीर्ण झाले. या तिन्ही परीक्षा उत्तमरीत्या उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांची रेल्वेच्या कनिष्ठ अभियंता ‘परमनंट वे निरीक्षक’ (पी.वे.) पदी नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांची सोलापूर रेल्वे विभागातच नियुक्ती झाली आहे. शिंदे पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले असून आई गृहिणी तर वडील एस.टी. मध्ये ड्रायव्हर पदावरून नुकतेच निवृत्त झालेले आहेत तर लहान बहीण प्रियांका देखील सध्या स्वेरीमध्येच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग मध्ये अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी रोंगे, सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम. एम. पवार तसेच इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. स्वेरीमध्ये बी.ई.च्या तिसऱ्या वर्षापासून गेटचे मार्गदर्शन केले जाते त्यामुळे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असतानाच गेट परीक्षेत देखील उत्तम यश संपादन केले. त्यामुळे त्याना पुढे त्यांना एन.आय. टी.मध्ये प्रवेशही मिळाला. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी रोंगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना शिंदे-पाटील म्हणाले की, 'स्वेरीत मिळणारे वैयक्तिक मार्गदर्शन, शिस्त आणि संशोधनाचे वातावरण यामुळे मला परीक्षा सहज देता आले. माझ्या यशात स्वेरी परिवाराचा खूप मोठा वाटा आहे.’ रेल्वेच्या पी.वे. परीक्षेत यश मिळाल्यामुळे शिंदे पाटील यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.